
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; वेतनवाढीसह सरकारकडून महत्त्वाचे निर्णय
मुंबई : बेस्ट बस कर्मचाऱ्यांनी अखेर आपला संप मागे घेतला आहे. रविवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची तर कंत्राटी (वेट लीज) कर्मचाऱ्यांना 2,000 रुपयांची हंगामी वेतनवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. नवीन वेतन करार होईपर्यंत अंतरिम दिलासाही देण्यात येणार आहे.
याशिवाय, प्रलंबित ग्रॅच्युइटीची रक्कम चालू आर्थिक वर्षात अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पुढील तीन वर्षांत 5,000 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, उर्वरित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पुढील 15 दिवसांत आणखी एक बैठक होणार असून सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून बेस्टची सेवा पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.







