


रत्नागिरी शहरातील रामआळीमध्ये सध्या गटाराचं काम सुरु आहे मात्र ऐन पावसाळ्यात आणि शाळांच्या सिझनमध्ये नगरपालिकेला हे शहाणपण कसं सुचलं? याबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात जागरच्या टीमने नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांची प्रतिक्रिया घेतली. त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील काही दिवसात हे काम पूर्ण होईल.
सध्या रामआळीमध्ये पावसाळा आणि शाळांसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी आहे. मात्र अशातच आधीच अरुंद असलेल्या रामआळीच्या रस्त्याच्या कडेला गटाराच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरु करण्यात आलं आहे. या कामामुळे पुस्तकं, युनिफॉर्म, पावसाळ्याची इतर खरेदी यासाठी आलेल्या नागरिकांना दुकानात जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नगरपालिकेने हे काम ऐन हंगामात घ्यायची काय गरज होती? आधी हे झोपा काढत होते का ? अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे. याबाबत नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांना विचारणा केली असता त्यांनी आपली बाजू मांडली.
या कामामुळे नागरिकांना त्रास होत आहे मात्र लवकरच हे काम पूर्ण होईल आणि राम आळीतील रस्त्याचे सर्व प्रश्न निकाली लागतील. पुढील काही दिवसात हे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा यांनी दिली आहे.







