

रस्त्यावर अचानक आलेल्या भटक्या गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बसचा अपघात झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी फाट्यानजीक घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
माहितीनुसार, बोरिवली-जयगड मार्गावरील (एमएच-२०-बीएल-२९४५) एसटी बस निवेंडी फाट्याजवळून जात होती. यावेळी एक गाय अचानक बससमोर आली. गाईला धडक बसू नये म्हणून चालकाने बस वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात बसवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याबाहेर जाऊन झाडावर आदळले.अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे सहा प्रवासी होते. धडक जोरदार असली तरी कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
या अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून समोरील काच पूर्णपणे फुटली आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
चालकाच्या सतर्कतेमुळे आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे मोठी जीवितहानी टळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.







