
होर्मुझजवळ जहाजावर हल्ला; दोन भारतीय खलाशांचा मृत्यू , मुख्य अभियंता बेपत्ता
होर्मुझ सामुद्रधुनीजवळ ओमानच्या किनाऱ्याजवळ ‘एमटी सेट्टेबेलो’ या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात दोन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून मुख्य अभियंता अद्याप बेपत्ता आहे. जहाजावरील 24 पैकी 21 कर्मचारी सुरक्षित वाचवण्यात आले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून बचाव व शोधकार्य करत असल्याचे स्पष्ट केले आहे. बेपत्ता असलेल्या तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याचे निश्चित झाले असून मुख्य अभियंत्याचा शोध सुरू आहे.
फॉरवर्ड सीमेन युनियन ऑफ इंडियाचे महासचिव मनोज यादव म्हणाले की, जहाजासोबतचा संपर्क पूर्णपणे विस्कळीत झाला असून तपशिलांची अद्याप पुष्टी केली जात आहे.
या घटनेतील मृत आणि बेपत्ता खलाशी हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश (देवरिया) आणि आंध्र प्रदेश येथील असल्याची माहिती समोर आली आहे.






