
कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार, अभिजित दिपके यांचा आक्रमक पवित्रा
पुण्यात आज कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संध्याकाळी ४:०० वाजता आंदोलनाला सुरुवात होईल. विद्यापीठाकडून अटी शर्तीसह आंदोलनाला परवानगी देण्यात आलीय. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुढील काही दिवसात इतर राज्यातही आंदोलन करणार असल्याची घोषणा अभिजीत दिपकेंनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक देखील सहभागी होणार आहेत. अभिजित दिपके १६ जूनला नागपुरात येणार असून देशातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि राष्ट्रीय परीक्षांमधील गैरप्रकारांच्या निषेधार्थ आंदोलन करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. येत्या 20 जून रोजी दिल्लीत आणखी व्यापक आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
देशातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, राष्ट्रीय परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) आता नागपुरात आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके हे १६ जून रोजी नागपुरात येणार असल्याची माहिती समोर आली असून, या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री Dharmendra Pradhan यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील आंदोलनानंतर पुण्यातही सीजेपीने आंदोलन केले होते. त्यानंतर आता उपराजधानी नागपुरात आंदोलन करून या मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. मात्र, या आंदोलनाला अद्याप पोलिस प्रशासनाची अधिकृत परवानगी मिळालेली नसल्याने त्याच्या आयोजनाबाबत अनिश्चितता कायम आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी आंदोलनाचे नियोजन करण्यात आले असले तरी अंतिम मंजुरी मिळालेली नाही. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परवानगी मिळाल्यास आंदोलन होणार की सुरक्षेच्या कारणास्तव ते रोखले जाणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, देशभरात चर्चेत आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने विविध शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा विषयक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर अभिजित दिपके यांनी २० जून रोजी दिल्लीत आणखी मोठे आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे.याबाबत बोलताना दिपके यांनी ६ जून रोजी जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनाचा उल्लेख केला. “कॉक्रोच जनता पार्टी केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित राहील, असे अनेकांना वाटत होते. मात्र जंतर-मंतरवरील आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला,” असा दावा त्यांनी केला.
यावेळी त्यांनी पालक आणि विद्यार्थ्यांनाही आवाहन केले. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असून, विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या आणि प्रश्न मांडण्यासाठी पुढे यावे, असे त्यांनी सांगितले. तसेच, “एका व्यक्तीचा आवाज दाबता येईल; मात्र लाखो तरुणांचा आवाज दाबणे शक्य नाही,” असेही ते म्हणाले.
सीजेपीच्या आंदोलनात्मक भूमिकेमुळे शैक्षणिक आणि युवकांशी संबंधित प्रश्न पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, २० जून रोजीच्या प्रस्तावित आंदोलनाकडे आता विद्यार्थी, पालक आणि राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे.





