
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ८०% पुस्तके आणि युनिफॉर्म उपलब्ध झालेले आहेत. इ. २ व ३ री चा अभ्यासक्रम बदलल्याने इ. ६वीची पुस्तके अद्याप उपलब्ध नाहीत. लवकरच ही पुस्तके उपलब्ध करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.
शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा १५ जूनपासून सुरू होत असताना, विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश मिळावा यासाठी शिक्षण विभागाने यंदा कडक भूमिका घेतली आहे. गणवेशाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास संबंधित दोषींवर थेट कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
२०२६-२७ या शैक्षणिक वर्षात गणवेश वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभागाच्या थेट देखरेखीखाली योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रत्येक गणवेशावर ‘समग्र शिक्षा अभियान’चा लोगो असणे बंधनकारक करण्यात आले असून, स्थानिक महिला बचतगटांमार्फत गणवेश शिवून घेण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
गुणवत्ता तपासणी पूर्ण झाल्यानंतरच संबंधितांचे बिल अदा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गणवेशासाठी वापरण्यात येणारे कापड उच्च दर्जाचे व त्वचेस सुरक्षित असणे आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
यंदा १०० टक्के पॉलिस्टर कापड वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. एखाद्या शाळेत गणवेशाचे कापड निकृष्ट दर्जाचे आढळल्यास त्याचा नमुना जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येईल. अहवालात दोष सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.






