
Candidature forms filed from Ratnagiri for the Legislative Council's Local Authorities' constituencies



रत्नागिरी- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद रायगड-तथा-रत्नागिरी-तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाकरिता निवडणूक कार्यक्रम 18 मे 2026 रोजीपासून घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच 18 मे 2026 पासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 25 जून 2026 पर्यंत रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या पूर्ण क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. सार्वजनिक व खासगी मालमत्तेवर फलक, बॅनर लावून मालमत्ता विरुपीत केल्यास अगर तशी तक्रार आल्यास मालमत्ता विरुपीकरण कायदा 1995 चे कलम 2 नुसार दंडनीय कारवाई करावी लागेल असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आदेशित केले आहे.
या निवडणुकीसाठी सोमवार 25 मे 2026 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार 1 जून 2026 होती. आजच्या शेवटाच्या दिवशी रत्नागिरीत 6 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये महायुती कडून अनिकेत तटकरे, महा विकास आघाडी कडून सुरेंद्रनाथ तथा बाळ माने, या व्यतिरिक्त दोन अपक्ष आणि दोन pvpi या पक्षाकडून अर्ज दाखल झाले आहेत.
मंगळवार 2 जून 2026 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून गुरुवार 4 जून 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. या निवडणुकांसाठी मतदान गुरूवार 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे. मतमोजणी सोमवार 22 जून 2026 रोजी करण्यात येईल, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गुरूवार, 25 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.




