

किनारपट्टीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत जेट्टी उभारणी आणि जेट्टीपर्यंतच्या पोचरस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुंबईसह कोकणातील एकूण १०४ कामांसाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे.
या कामांत जेट्टी उभारणी, पोचरस्ते, संरक्षक भिंती, धूपप्रतिबंधक बंधारे, गाळ काढणे तसेच प्रवासी सुविधांचा समावेश आहे. रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांतील प्रकल्पांना या निर्णयामुळे मोठी चालना मिळणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मार्च २०२६ अखेर या कामांसाठी १३३ कोटी ९२ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच २०२६-२७ या आर्थिक वर्षात आणखी १२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
यापैकी ७५ कामांसाठी १२६ कोटी रुपयांचा निधी असून उर्वरित २९ कामे बंदरांपर्यंत रस्ते, रेल्वेमार्ग आणि बॅकवॉटर विकासाशी संबंधित आहेत, ज्यासाठी ४४ कोटी रुपयांची तरतूद आहे.
किनारपट्टीवरील पायाभूत सुविधा मजबूत करण्याबरोबरच स्थानिक रोजगारनिर्मिती आणि पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.





