

केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-६६ वर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर भरधाव कार पाठीमागून आदळल्याने या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तामिळनाडूतील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी रात्री सुमारे ११.४० वाजण्याच्या सुमारास कॅपमंगलमजवळ पनमपिक्कुन्नू येथे झाला. मदुराई नोंदणीची ही कार गुरुवायूरहून कोडुंगल्लूरच्या दिशेने जात होती. राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने त्याच दिशेने एक ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला होता. याच ट्रकवर भरधाव कारने मागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कारमधील सर्व प्रवासी या अपघातात मृत्युमुखी पडले. ते तामिळनाडूतील विद्यार्थी असल्याचे सांगितले. जात आहे. घटनास्थळी डिंडीगुल येथील पीएसएनए इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याचे ओळखपत्र आढळून आले आहे. त्यामुळे मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस तसेच अग्निशमन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कार पूर्णपणे चिरडली गेल्याने बचावकार्य मोठ्या आव्हानात्मक परिस्थितीत करावे लागले. दोन जखमींना कारमधून बाहेर काढण्यासाठी वाहनाचा पत्रा कापण्यात आला.
अपघातातील मृतदेह त्रिशूर मेडिकल कॉलेजच्या शवागारात नेण्यात आले आहेत. या भीषण दुर्घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.







