

मुंबई : महाराष्ट्रात सध्या पावसाची तीव्रता कमी-अधिक स्वरूपात सुरू असून, अनेक भागांत मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी जोरदार पावसाचा प्रभाव ओसरला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नाशिक, जळगाव तसेच पुण्याच्या घाटमाथा परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तसेच विजांच्या कडकडाटासह वादळी सरींचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला होता.
दरम्यान, गुरुवारपासून राज्यातील वादळी पावसाचा प्रभाव आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत बहुतांश भागांत केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
यामुळे मुसळधार पावसापासून काहीसा दिलासा मिळणार असला तरी शेतकरी आणि नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







