

मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलला बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) मोठा आर्थिक दणका बसला आहे. टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडला (IHCL) 5.51 कोटी रुपयांच्या अतिरिक्त दंडाची नोटीस बजावण्यात आली असून एकूण दंडाची रक्कम आता 103.08 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
कंपनीने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जारी करण्यात आलेल्या मालमत्ता कर बिलामध्ये थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या दंडाचा समावेश आहे. यामध्ये 5,51,35,972 रुपयांच्या अतिरिक्त दंडाचा समावेश असून यापूर्वीच्या दंडासह एकूण रक्कम 103 कोटींहून अधिक झाली आहे.
आयएचसीएलने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, “ताज लँड्स एंड, मुंबई” या मालमत्तेच्या थकीत करावर हा अतिरिक्त दंड लावण्यात आला आहे. मात्र, कंपनीने या दंडावर आक्षेप घेतला असून कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात कंपनी संबंधित बिलांना आव्हान देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू राहणार आहे.







