
मुंबई : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कुर्ला पश्चिमेकडील चिरागनगर परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. गौसिया चाळ परिसरात पहाटेच्या सुमारास डोंगराचा भाग अचानक कोसळून दरड वस्तीत आली. या घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून चार ते पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरड कोसळल्याने परिसरातील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, मुंबई महापालिका (BMC), एनडीआरएफ (NDRF) तसेच इतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
ही दुर्घटना पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. काही क्षणांत मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा ढिगारा वस्तीत आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ प्रशासनाला कळविल्यानंतर बचावकार्याला वेग देण्यात आला.
डीसीपी गणेश शिंदे यांनी सांगितले की, पावसामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरड कोसळण्याची घटना घडली आहे. आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी आवश्यक ती सर्व यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून डोंगर उतारांवरील आणि धोकादायक ठिकाणी वसलेल्या वस्त्यांना दरड कोसळण्याचा धोका अधिक असतो. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यातही अशा अनेक भागांना संवेदनशील म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच मृत आणि जखमींची नेमकी संख्या स्पष्ट होणार आहे.







