

मुंबई : महाराष्ट्र शासनाने अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांसाठी सुरू केलेली मोफत साडी योजना पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचा शासन निर्णय (GR) जारी केला असून, या योजनेअंतर्गत होणारे साड्यांचे वाटप कायमचे थांबवण्यात आले आहे.
राज्याच्या तिजोरीवर वाढता आर्थिक ताण आणि इतर अनेक योजनांचा भार लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात ही योजना सुरू ठेवणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले आहे.
या निर्णयामुळे राज्यातील सुमारे २५ लाख गरीब कुटुंबांतील महिलांना यंदाच्या दिवाळीत मिळणारी मोफत साडी मिळणार नाही. तसेच, या योजनेमुळे चालना मिळणाऱ्या यंत्रमाग उद्योगावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची पात्रता पडताळणीही राज्यभरात सुरू असून, विविध कारणांमुळे अनेक महिलांना अपात्र ठरवून त्यांचे दरमहा ₹१,५०० चे हप्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.







