

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत १८ जून २०१९ पासून ‘मधकेंद्र (मधमाशी पालन) योजना’ राज्यभर राबविण्यात येत असून, ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला चालना मिळत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मधमाशी पालनासाठी आवश्यक साहित्य पुरवठ्यासह एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाते.
मधमाशी पालन हा कमी खर्चात सुरू होणारा आणि शेतीला पूरक ठरणारा व्यवसाय असून, मध, मेण यांसारख्या उत्पादनांमधून चांगले उत्पन्न मिळते. तसेच परागीभवनामुळे कृषी उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्यास मदत होते.
योजनेत प्रशिक्षणाचीही सोय करण्यात आली असून, पात्र लाभार्थ्यांना निवासी प्रशिक्षण मोफत दिले जाते. या उपक्रमामुळे शेतकरी आणि मधपाळांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. इच्छुकांनी जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







