
पीएम मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान; संरक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर इंडोनेशियात दाखल झाले असून, त्यांना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘बिंतांग आदिपूर्णा’ प्रदान करण्यात आला. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबावो सुबियांतो यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला.
हा सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदी यांनी तो कोट्यवधी भारतीय नागरिकांना समर्पित असल्याचे सांगितले. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील ऐतिहासिक व घनिष्ठ संबंधांचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, इंडोनेशियन सरकार आणि नागरिकांचे त्यांनी आभार मानले.
‘बिंतांग आदिपूर्णा’ हा इंडोनेशियाचा सर्वोच्च शासकीय सन्मान असून, 1959 पासून परदेशी राष्ट्रप्रमुखांना द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी दिला जातो. भारत-इंडोनेशिया संबंध अधिक मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत पंतप्रधान मोदी यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
दरम्यान, या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये संरक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. भारत इंडोनेशियाला ईव्हीएम (EVM) प्रणाली विकसित करण्यासाठी मदत करणार आहे. तसेच, इंडोनेशियाने भारताकडून अस्त्र क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीसाठीही सहकार्य वाढविण्यात येणार असून, भारत अतिरिक्त बॅटरी पुरवणार आहे.
याशिवाय, अत्यावश्यक खनिजांच्या पुरवठा साखळीला बळकटी देण्यासाठी भारत इंडोनेशियात निकेल, पोलाद आणि दुर्मिळ मृदा घटकांच्या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. दोन्ही देशांनी संयुक्तपणे सबांग बंदर विकसित करण्याचा निर्णयही घेतला असून, हे बंदर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या मलक्का सामुद्रधुनीजवळ आहे.
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी इस्ताना मर्देका येथे राष्ट्रपती प्रबावो सुबियांतो यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली असून, द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला.







