
केतन अग्रवाल हत्या प्रकरण; मुख्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर वडगाव मावळ न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (ज्युडिशिअल कस्टडी) सुनावली आहे. त्यानुसार दोन्ही आरोपींना येरवडा मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहे.
या प्रकरणाच्या तपासात सातत्याने धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सिया गोयलच्या नार्को आणि लाय डिटेक्टर चाचणीसाठी पोलिसांनी न्यायालयाकडे मागणी केली होती. मात्र बचाव पक्षाच्या वकिलांनी आक्षेप घेतल्यानंतर दोन्ही आरोपींनी या चाचण्यांना स्पष्ट नकार दिला.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, हत्येपूर्वी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी पुण्यातील लुलानगर टेकडीवर केतनला ढकलून देण्याचा सराव केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले असून, तपास यंत्रणांनी या बाबीची सखोल चौकशी सुरू ठेवली आहे.
दरम्यान, सिया गोयलच्या मोबाईलमधील डिलीट केलेले चॅट्स पोलिसांनी यशस्वीरीत्या रिकव्हर केले आहेत. या चॅट्समध्ये संभाषणासाठी कोड-वर्ड्सचा वापर केल्याचे स्पष्ट झाले असून, तपासात ही माहिती महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलीस सध्या या प्रकरणातील सर्व पुरावे आणि डिजिटल माहितीचा बारकाईने अभ्यास करत असून, पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.







