

मुंबई: राज्याच्या जलदी क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवण्यात आला असून १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत आता मासेमारी बंदी असणार आहे अशी महत्वाची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत दिली. गुजरात आणि महाराष्ट्र या शेजारील राज्यांमध्ये मासेमारी बंदीच्या कालावधीत एकसूत्रता असणे अत्यंत गरजेचे आहे; अन्यथा इतर राज्यांतील नौका दुसऱ्या राज्याच्या जलदी क्षेत्रात घुसून बेकायदेशीर मासेमारी करण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडेही मंत्री नितेश राणे यांनी लक्ष वेधले. मच्छीमारांकडून प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हा समिती, राज्य सल्लागार व सहनियंत्रण समितीकडून अहवाल मागवण्यात आले होते. या समित्यांनीही पावसाळी बंदीचा कालावधी १ जून ते १५ ऑगस्टपर्यंत निश्चित करण्याबाबत आपले सकारात्मक अभिप्राय दिले असल्याची माहिती ना. राणे यांनी सभागृहाला दिली.







