
सीडबॉल्सच्या माध्यमातून हरितक्रांती ; क्षत्रिय मराठा मंडळाचा अनोखा उपक्रम

पर्यावरण संवर्धनासाठी केवळ वृक्षारोपण नव्हे, तर वृक्षांची नैसर्गिक वाढ आणि दीर्घकालीन जपणूक महत्त्वाची असल्याचा संदेश देत क्षत्रिय मराठा मंडळाने यंदा एक अभिनव उपक्रम राबवला. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करणाऱ्या मंडळाने यावेळी पारंपरिक पद्धतीला फाटा देत बीजारोपणाचा पर्याय स्वीकारला.
लागवड केलेल्या रोपांच्या देखभालीसाठी लागणारा खर्च, संरक्षक जाळ्यांची आवश्यकता आणि काही ठिकाणी रोपे व जाळ्या चोरीला जाण्याचे अनुभव लक्षात घेऊन मंडळाने सीडबॉल्सच्या माध्यमातून हरितीकरणाचा संकल्प केला. यासाठी सदस्यांना विविध वृक्षांच्या बिया गोळा करून सीडबॉल्स तयार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाला महिला, पुरुष आणि लहान मुलांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंबा, फणस, जांभूळ, रातांबे, बदाम आदी वृक्षांच्या बियांचा वापर करून हजारो सीडबॉल्स तयार करण्यात आले.
उद्यमनगर-झाडगाव एमआयडीसी परिसरातील महामार्गालगत मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरणामुळे झाडांची संख्या घटल्याने सावली आणि जैवविविधतेवर परिणाम होत असल्याची बाब लक्षात घेऊन मंडळाच्या सदस्यांनी या परिसरात सुमारे २५०० सीडबॉल्सची पेरणी केली.
वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचा विचार केंद्रस्थानी ठेवत क्षत्रिय मराठा मंडळाने पर्यावरण संरक्षणासाठी एक शाश्वत आणि प्रभावी पर्याय निवडला असून, या उपक्रमातून समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.







