
कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीच्या धावपटूंची दमदार कामगिरी
दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत रत्नागिरीच्या दोन धावपटूंनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ९० किलोमीटरच्या या खडतर स्पर्धेत प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ यांनी यशस्वीरीत्या मजल मारत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.
डर्बन ते पीटरमॅरिट्झबर्ग या दरम्यानच्या कठीण ‘अप रन’ मार्गावर झालेल्या स्पर्धेत अभिजित पड्याळ यांनी पहिल्याच प्रयत्नात ९ तास ५१ मिनिटांत शर्यत पूर्ण करत प्रभावी कामगिरी केली. तर संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथील सुपुत्र व सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी यांनी सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा पूर्ण करण्याचा मान मिळवला. त्यांनी ११ तास २७ मिनिटांत स्पर्धा पूर्ण केली.
गतवर्षी एकट्याने कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रसाद देवस्थळी यांनी यंदा अभिजित पड्याळ यांना प्रेरित करून या जागतिक स्पर्धेत सहभागी करून घेतले. कठोर सराव, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर दोघांनीही ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
या यशानंतर रत्नागिरी जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, टीम कोकण कोस्टल आणि टीम गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन यांच्यावतीने दोघांचा गौरव करण्यात आला.
यावेळी दक्षिण आफ्रिकेत उपस्थित हजारो धावपटूंना रत्नागिरीत आयोजित केल्या जाणाऱ्या’कोकण कोस्टल मॅरेथॉन’ आणि ‘गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन’मध्ये मध्ये सहभागी होण्याचे निमंत्रणही देण्यात आले. भविष्यात जगभरातील धावपटू कोकणातील या स्पर्धांकडे आकर्षित होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.







