

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाने दडी दिल्याने तापमानात मोठी वाढ झाली असून उष्म्यामुळे विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेता जिल्हा परिषद शाळांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
जिल्हा परिषद सीईओ वैदेही रानडे यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार, जिल्ह्यातील सर्व शाळा सोमवार (दि. २२) पासून सकाळी ७ ते ११.३० या वेळेत भरवण्यात येणार आहेत. हा निर्णय ३० जूनपर्यंत लागू राहणार आहे.
जूनच्या सुरुवातीला पावसाने आगमन केल्यानंतर काही काळ विश्रांती घेतल्याने तापमान वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना उष्म्याचा मोठा त्रास होत होता. याबाबत पालक, विद्यार्थी व विविध संघटनांनी सकाळच्या सत्राची मागणी केली होती.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीतही हा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यानंतर शाळा सकाळच्या वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, हवामान अनुकूल झाल्यास शाळा पुन्हा पूर्वीच्या वेळेनुसार सुरू केल्या जाणार आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापनांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टोपीचा वापर आणि उष्म्यापासून संरक्षणासाठी मैदानावरील खेळ टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.







