
नांदिवडे गॅस टर्मिनलच्या स्थलांतरासाठी ३० ऑक्टोबरची डेडलाइन; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरी जिल्ह्यातील नांदिवडे-जयगड परिसरात लोकवस्तीजवळ उभारण्यात येत असलेल्या गॅस टर्मिनल प्रकल्पाच्या स्थलांतराची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन देत ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रकल्प स्थलांतराबाबत निर्णय जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिंदाल कंपनीच्या प्रकल्पामुळे प्रदूषण, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप शेतकरी व मच्छीमारांनी केला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने २७ मे २०२५ रोजी गॅस टर्मिनलचे काम थांबवण्याचे आदेश दिले असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच परिसरात रस्ते, आरोग्य सुविधा, अग्निशमन व्यवस्था, नियमित वीजपुरवठा आणि प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारासारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कंपनीने जमीन संपादित करताना दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी विहिरींच्या दूषित पाण्याच्या अहवालांसह संबंधित कागदपत्रे प्रशासनाला सादर करणार असल्याचे सांगितले आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत मागणीवर निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 2 नोव्हेंबर पासून हजारो शेतकरी व मच्छीमार आमरण उपोषणाला बसतील, असा इशारा पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे नांदिवडे-जयगड परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.





