
नाशिकमध्ये बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 5 जणांना अटक

नाशिक जिल्ह्यात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत पाच जणांना अटक केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव शिवारातील एका बंगल्यावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी चलनी नोटांच्या आकाराचे कापलेले कोऱ्या कागदाचे गठ्ठे, विविध रसायने तसेच नोटा छपाईसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय 9.75 लाख रुपयांची रोकडही हस्तगत करण्यात आली असून त्यामध्ये 500 रुपयांच्या 1,950 मूळ भारतीय चलनी नोटांचा समावेश आहे.
या प्रकरणात अमरेश्वर सुधाकर आइत्था, दासरी प्रसाद सत्यई, गोकुळ आनंदराव दाते, हिरामण पुंजा दाते आणि मच्छिंद्र भगवान घंदत या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी 500 रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.







