
मुंबई : राज्यात 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्यदिनाचा शासकीय सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मंत्रालय, मुंबई येथे सकाळी 09.05 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण समारंभ पार पडणार आहे. पुणे येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते शासकीय कार्यक्रम होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.
राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर पालकमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीड येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नागपूर येथे चंद्रशेखर बावनकुळे, तर रत्नागिरी येथे उदय सामंत ध्वजारोहण करतील. सोलापूर जिल्ह्यात जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
तसेच कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पालकमंत्री किंवा संबंधित मंत्री अनुपस्थित असल्यास विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते कार्यक्रम पार पाडण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यभर शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमांमध्ये वेळेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.







