
रक्तपेढ्यांसाठी राज्यात नवे नियम; FDAकडून सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA)ने राज्यातील रक्तपेढ्यांसाठी प्रथमच सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. रुग्ण आणि रक्तदात्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट केले.
नियमांची एकसमान अंमलबजावणी
राज्यातील काही रक्त केंद्रांच्या तपासणीत कायद्याचे पूर्ण पालन होत नसल्याचे आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरात नियमांची प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व रक्तपेढ्यांना त्यांच्या कार्यपद्धतीचा तात्काळ आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
परवाना अनिवार्य; नियमांचे काटेकोर पालन आवश्यक
FDAच्या निर्देशानुसार कोणत्याही रक्त केंद्राला वैध परवान्याशिवाय रक्त संकलन, प्रक्रिया, साठवणूक किंवा वितरण करण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच ‘ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स रूल्स, 1945’ मधील सर्व तरतुदींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तपासणी, साठवणूक आणि गुणवत्ता नियंत्रणावर भर
नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पायाभूत सुविधा, पात्र कर्मचारी, रक्त व रक्तघटकांची तपासणी, साठवणूक, लेबलिंग, गुणवत्ता नियंत्रण आणि जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रत्येक रक्ताच्या युनिटची एचआयव्ही, हिपॅटायटीस बी व सी, सिफिलिस आणि मलेरिया यांसाठी तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच ई-रक्तकोश पोर्टलवर दररोज माहिती अद्ययावत ठेवणेही आवश्यक करण्यात आले आहे.
आवश्यक सुविधा व पात्र कर्मचारी बंधनकारक
प्रत्येक रक्तपेढीत समुपदेशन कक्ष, गुणवत्ता नियंत्रण सुविधा तसेच पात्र वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक कर्मचारी आणि समुपदेशक असणे आवश्यक आहे. 2020 मधील सुधारित दाता निवड नियमांचे पालन करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नियमित ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
IIT मुंबईच्या दोन मेसवर कारवाई
दरम्यान, FDAने मुंबईतील IIT पवई परिसरातील वसतिगृह क्रमांक 1 आणि 2 मधील दोन मेस (कँटीन) बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तपासणीदरम्यान आवश्यक नोंदणी व परवान्यांचा अभाव आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
वसतिगृह क्रमांक 12, 13 आणि 14 मधील भोजनगृहांमध्ये काही त्रुटी आढळून आल्याने संबंधित केटरर्सना सुधारणा करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत FDAकडून खानावळी व रेस्टॉरंट्सवर कारवाई सुरूच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.







