
मुंबई : ‘अंमली पदार्थ मुक्त मुंबई’ या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता राज्यभर व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती व समुपदेशन समित्यांची स्थापना केली जाणार असून, विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
या समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी सातत्याने जनजागृती केली जाईल. विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल वेळेत ओळखून त्यांना आवश्यक समुपदेशन उपलब्ध करून देणे, पालक आणि शिक्षकांमध्ये समन्वय साधणे, तसेच गरज भासल्यास संबंधित तज्ज्ञांकडे मार्गदर्शनासाठी पाठविण्याची जबाबदारीही या समित्यांवर सोपविण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने २०२९ पर्यंत देश अमली पदार्थमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून अमली पदार्थांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई आणि व्यापक जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानेही राज्यात व्यसनमुक्तीची चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
या अभियानामुळे तरुण पिढीला व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मोठी मदत होणार असून, शिक्षण संस्थांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवून सुरक्षित आणि निरोगी समाज घडविण्याचा यामागचा उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.







