
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात सुरू केलेले 26 दिवसांचे उपोषण अखेर संपवण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने त्यांच्या तीन प्रमुख मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
वांगचुक यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा तोडगा निघाल्याचे त्यांनी सांगितले.
जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर तसेच 20 जुलै रोजी झालेल्या ‘संसद चलो’ मोर्चात सहभागी झालेल्यांवर कोणताही एफआयआर, कायदेशीर कारवाई किंवा इतर दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे लेखी आश्वासन सरकारकडून देण्यात आल्याचे वांगचुक यांनी सांगितले.
तसेच, कथित पेपरफुटी प्रकरणात मृत्यू पावलेल्या 20 हून अधिक विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या मागणीला लेखी संमती मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिक्षण प्रणाली, परीक्षा पद्धती आणि उत्तरदायित्व या महत्त्वाच्या मुद्द्यांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी ही चर्चा महत्त्वाची ठरेल, असे वांगचुक यांनी अधोरेखित केले.
मात्र, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत सरकारकडून कोणतेही आश्वासन मिळालेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तीन प्रमुख मागण्यांवर लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच उपोषण समाप्त करण्याचा निर्णय घेतल्याचे वांगचुक यांनी सांगितले.






