

नवी दिल्ली : CJPच्या ‘चलो संसद’ मार्चच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. जंतर-मंतर परिसरात सुमारे ५ हजार पोलिस व सुरक्षा जवान तैनात असून कलम 163 लागू करण्यात आले आहे.
निषेधासाठी जमलेल्या आंदोलकांची सुरक्षा दलांशी झडप झाल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी बॅरिकेडिंग तोडण्यात आले असून वाहनांचे नुकसानही झाले आहे. आंदोलक संसद भवनाच्या दिशेने पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, पोलिसांनी लाठीचार्ज झाल्याचा दावा नाकारत आंदोलन नियंत्रित व नियोजनबद्ध पद्धतीने हाताळले जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
परिसरात शेकडो जॅमर्स बसवण्यात आले असून इंटरनेट सेवा खंडित ठेवण्यात आली आहे. तणावपूर्ण स्थिती लक्षात घेता मल्टी-लेयर बॅरिकेडिंग, स्कॅनर तपासणी आणि कडक सुरक्षा तपासणीनंतरच प्रवेश दिला जात आहे.
जंतर-मंतर ते संसद मार्ग दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून सुमारे १२ हजारांहून अधिक लोक उपस्थित असल्याचा अंदाज आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दंगल नियंत्रण पथके, रुग्णवाहिका तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी २४ तास लक्ष ठेवून आहेत. शेजारील राज्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांनी संसदेकडे कूच करण्याच्या घोषणेमुळे संपूर्ण नवी दिल्ली जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.







