

राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 13.56 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो प्रवाशांच्या खिशावर ताण पडणार असून, एसटीने ही वाढ अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ, तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली मोठी वाढ या सर्व घटकांचा विचार करून ही भाडेवाढ करण्यात आल्याचे महामंडळाने सांगितले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, या नव्या दरवाढीनंतर साध्या बसेसवर लागू असलेली 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. याआधी गर्दीच्या हंगामात ही वाढ लागू करण्यात आली होती आणि ती 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र, नव्या भाडेवाढीमुळे तो निर्णय मागे घेण्यात आला आहे.
एसटी महामंडळाच्या मते, वाढत्या खर्चाचा मोठा आर्थिक ताण दैनंदिन कामकाजावर पडत होता. सेवा सुरळीत ठेवण्यासाठी तसेच प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड सेवा देण्यासाठी भाडेवाढ आवश्यक ठरली आहे. या निर्णयामुळे एसटीची आर्थिक स्थिती अधिक सक्षम होईल आणि सेवा अधिक टिकाऊ बनवता येईल, असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या निर्णयाचे समर्थन केले आहे. “प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची काळजी घेत भाडेवाढ करण्यात आली आहे. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, महागाईचा सामना करत असलेल्या सामान्य प्रवाशांसाठी ही दरवाढ आणखी एक झटका मानली जात आहे. आता एसटीने प्रवास करणाऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार असल्याने, या निर्णयाचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे.







