

मुंबईतील मानखुर्द येथील जनता नगर परिसरात मुसळधार पावसादरम्यान तीन मजली कच्च्या चाळीचा भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच लहान मुले आणि एका महिलेचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि महानगरपालिकेच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून गोवंडीतील शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या परिसरातील धोकादायक इमारतींची चौकशी करण्यात येणार असून, मृतांच्या कुटुंबीयांना नियमानुसार आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, महापौर रितू तावडे यांनीही रुग्णालयात जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.







