

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
कामाचा अतिताण आणि सततचे दौरे यामुळे त्यांना ताप व अशक्तपणा जाणवू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिंदे यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नियोजित सर्व सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले. ठाण्यात आयोजित करण्यात आलेला एका पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.







