
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 निकाल जाहीर; 4,103 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या निकालानुसार राज्यसेवा गट-अ आणि गट-ब पदांसाठी झालेल्या पूर्व परीक्षेतून 4,103 उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी पात्रता मिळवली आहे.
31 मे रोजी पार पडलेल्या पूर्व परीक्षेनंतर अवघ्या महिन्याभरात निकाल जाहीर करण्यात आल्याने आयोगाच्या जलद कार्यपद्धतीची चर्चा होत आहे. आयोगाने पात्र उमेदवारांची यादी, बैठक क्रमांक तसेच प्रवर्गनिहाय कट-ऑफ गुण अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत.
मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना स्वतंत्रपणे अर्ज सादर करावा लागणार असून निर्धारित परीक्षा शुल्कही भरावे लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी मिळेल. मुख्य परीक्षेची अधिसूचना लवकरच स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SEBC) आरक्षणासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका आणि इतर आरक्षणविषयक न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून हा निकाल जाहीर करण्यात आल्याचेही आयोगाने नमूद केले आहे.
जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये पुणे केंद्रातील 1,828 उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. अहिल्यानगर येथील १९३, अकोला येथील ४४, अलिबाग येथील ३, अमरावती येथील ७८, बीड येथील २७, भंडारा येथील १६, बुलढाणा येथील २७, चंद्रपूर येथील २१, छत्रपती संभाजीनगर येथील १७२, धाराशिव येथील ३७, धुळे येथील २७, गडचिरोली येथील १४, गोंदिया येथील १७, हिंगोली येथील १५, जळगाव येथील ६५, जालना येथील २१, कोल्हापूर येथील १७९, कुडाळ येथील १०, लातूर येथील ७९, मुंबई मध्य येथील ९३, मुंबई पश्चिम येथील ४३, नागपूर येथील ११८, नांदेड येथील ७६, नंदूरबार येथील १८, नाशिक येथील १९९, नवी मुंबई येथील ७२, पालघर येथील १५, परभणी येथील २७, पुणे येथील १८२८, रत्नागिरी येथील १, सांगली येथील १०६, सातारा येथील १४५, सोलापूर येथील ८७, ठाणे येथील ७५, वर्धा येथील १३, वाशिम येथील २४, यवतमाळ येथील २८ उमेदवारांचा समावेश आहे.
मुख्य परीक्षेच्या अर्ज प्रक्रिया, शुल्क भरणा, परीक्षा दिनांक आणि इतर महत्त्वाच्या सूचनांसाठी उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावरील पुढील अधिसूचनांवर नियमितपणे लक्ष ठेवावे, असे आवाहन आयोगाने केले आहे.







