
पाण्याअभावी लोटे एमआयडीसीतील उद्योगांना ब्रेक; कोट्यवधींचे नुकसान
कोयना जलविद्युत प्रकल्पातील वीज निर्मिती पूर्णपणे बंद झाल्याने वाशिष्टी नदीतील पाण्याचा प्रवाह थांबला असून त्याचा फटका लोटे परशुराम, खेड आणि खडपोली औद्योगिक वसाहतींना बसला आहे. पाण्याअभावी अनेक उद्योगांनी उत्पादन बंद केले असून पुढील दोन दिवसांत सर्वच कारखाने अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याची वेळ उद्योजकांवर येण्याची शक्यता आहे. गेल्या ४० वर्षांत प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.
कोयना धरणातील पाणी पोफळी, कोळकेवाडी आणि अलोरे येथील जलविद्युत प्रकल्पांतून वीज निर्मितीनंतर वाशिष्टी नदीत सोडले जाते. एमआयडीसीने वालोपे येथे उभारलेल्या जॅकवेलद्वारे दररोज सुमारे १६ लाख लिटर पाणी उचलून लोटे परशुराम, खेड आणि खडपोली औद्योगिक वसाहतींना पुरवठा केला जातो. मात्र, सध्या कोयना प्रकल्पातील वीज निर्मिती बंद असल्याने १५ जूनपासून एमआयडीसीचे पंपिंग स्टेशनही बंद पडले आहे.
यामुळे लोटे एमआयडीसीतील औषधनिर्मिती, रासायनिक, कृषी-आधारित तसेच पेय उत्पादन करणाऱ्या उद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. घरडा केमिकल्स, डाऊ अॅग्रो, एक्सेल, अल्फा ब्लू केम, थर्स ऑरगॅनिक, दीपक केमटेक्स, केशर पेट्रोप्रॉडक्ट्स, सहस्र केमिकल्स, डॉर्फ केटल, ए. बी. मॉरी (इंडिया), लक्ष्मी ऑरगॅनिक, पिंटोकेम, निरॅक पेंट्स तसेच हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेज यांसारख्या नामांकित कंपन्यांना पाणीटंचाईचा फटका बसला आहे.
काही उद्योगांकडे साठवण टाक्यांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठाही संपल्याने सात उत्पादन युनिट्स बंद करण्यात आली असून इतर अनेक कारखान्यांनीही उत्पादन थांबवले आहे. पिण्याच्या पाण्यापासून ते कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन गरजांसाठीही पाणी उपलब्ध नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
दरम्यान, कोयना प्रकल्पातील वीज निर्मिती बंद असताना कोळकेवाडी धरणातील पाणी उद्योगांना उपलब्ध करून देता येईल का, याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार एमआयडीसीचे अधिकारी आणि महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे तत्काळ पर्याय उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.औद्योगिक क्षेत्रातील ही अभूतपूर्व पाणीटंचाई तातडीने दूर न झाल्यास उत्पादन, रोजगार आणि निर्यातक्षम उद्योगांवर गंभीर परिणाम होण्याची भीती उद्योजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.







