

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्यांनी ठाकरे गटातील १६ आमदार आणि ७ खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात असल्याचेही शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे.
मात्र, ठाकरे गटाने हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. पक्षातील सर्व आमदार आणि खासदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामागे ठामपणे उभे असल्याचा दावा खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी केला आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना कोणताही आधार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ठाकरे गटातील सूत्रांनी सांगितले की, पक्षात पुन्हा फुट पडू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी खासदारांशी वैयक्तिक संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्याशी चर्चा करून सध्याची परिस्थिती जाणून घेतली जात असून, कोणत्याही प्रकारच्या संभाव्य फोडाफोडीची शक्यता टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर एकसंध शिवसेनेत फूट पडली होती आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच २२ जून रोजी पक्षाच्या सर्व आमदार आणि विधान परिषद सदस्यांची बैठक बोलावली आहे.
यादरम्यान ठाकरे गटाने संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. ठाकरे गटाने थेट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत केवळ त्यांच्याच पक्षाला अधिकृत मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडींकडे सगळ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.







