
रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीची सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलातर्फे होमगार्ड जवानांसाठी ‘मरीन होमगार्ड’ विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून जवानांना सागरी सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.
प्रशिक्षणादरम्यान होमगार्ड जवानांना समुद्रातील आपत्कालीन परिस्थितीत बचाव आणि मदतकार्य कसे करावे, सागरी सुरक्षेची मूलभूत तत्त्वे, तसेच कयाक बोटिंगसंदर्भातील सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षणामुळे होमगार्ड जवानांची सागरी सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि बचावकार्यातील क्षमता अधिक वाढणार असून किनारपट्टी भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे. सागरी सुरक्षेचे जाळे अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.







