
राजकीय भूकंप : थोड्याच वेळात ६ खासदारांचा शिंदे गटात होणार अधिकृत प्रवेश…

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील ६ खासदार आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर हे सहा खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही अधिकृत माहिती दिली आहे.
हे सर्व खासदार पोलिस बंदोबस्तासह मुंबईत दाखल झाले असून थोड्याच वेळात त्यांचा जाहीर प्रवेश सोहळा पार पडणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रम स्थळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खासदारांचा शिंदे गटात जाण्याचा निर्णय साधारण एक आठवड्यापूर्वीच झाला होता. कायदेशीर व इतर औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होत आहे.
आज मुंबईत होणाऱ्या विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. या ६ खासदारांच्या प्रवेशामुळे संसदेत आणि राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. शिंदे गटाची ताकद यामुळे आणखी वाढणार आहे.







