

मुंबई : इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वाहनांचे मायलेज कमी होत असल्याचा दावा करत त्यांनी ग्राहकांना १०० टक्के शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकार इंधन आयात कमी करणे, पर्यावरणपूरक धोरण राबविणे आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढवत आहे. मात्र, या धोरणाचा थेट परिणाम वाहनधारकांवर होत असल्याचे ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे. इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे मायलेज घटत असल्याच्या तक्रारी वाढत असून त्यामुळे वाहनधारकांचा इंधन खर्चही वाढत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
ठाकरे यांनी या संदर्भात पारदर्शकतेची मागणी करत पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिसळले आहे, याची स्पष्ट माहिती प्रत्येक पेट्रोल पंपावर देण्यात यावी, असे सुचवले आहे. तसेच, ज्यांना शुद्ध पेट्रोल वापरायचे आहे, त्यांच्यासाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय, इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा वाहनांच्या इंजिनवर, देखभाल खर्चावर आणि दीर्घकालीन कार्यक्षमतेवर नेमका काय परिणाम होतो, याचा स्वतंत्र अभ्यास करून तो सार्वजनिक करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने देशात २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू आहे. सरकारच्या मते, यामुळे कच्च्या तेलावरील आयात कमी होईल, प्रदूषणात घट होईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त बाजारपेठ मिळेल. मात्र, वाहनधारकांच्या खर्च आणि मायलेजचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे..







