
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अध्यक्षपदावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असली, तरी त्यांच्या नियुक्तीवर आता पक्षांतर्गत आक्षेप घेतले जात आहेत.
पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सचिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाविरोधात कायदेशीर नोटीस बजावली आहे. २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पार पडलेली निवडणूक प्रक्रिया पक्षघटनेविरोधात व विधिसंमत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सिंह यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वीही पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून या त्रुटींबाबत माहिती दिली होती. मात्र, तीन महिन्यांनंतरही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कायदेशीर नोटीस देण्याचा निर्णय घ्यावा लागला.
ते म्हणाले, “मी सुनेत्रा पवारांना पक्षाचे प्रमुख मानतो, पण निवडणूक प्रक्रियेत त्रुटी आहेत. भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून ही बाब दुरुस्त करणे आवश्यक आहे.”
तसेच, पक्षाचे निवडणूक चिन्ह सध्या सर्वोच्च न्यायालयात वादातीत असल्याने निवडणूक आयोगाकडून कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठीच हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना नोटीस बजावण्यात आली असून, पक्षातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येत आहेत.







