
रत्नागिरीत मोहरमच्या दिवशी धडक कारवाई; ५१ किलो ‘प्राण्याचे मांस’ जप्त
June 27, 2026 1 Min Read

रत्नागिरी शहरात मोहरमच्या दिवशी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तब्बल ५१ किलोहून अधिक ‘प्राण्याचे मांस’ जप्त केले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या मांसाची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असल्याची चर्चा रंगली आहे.
एलसीबीचे पथक शहर परिसरात पेट्रोलिंग करत असताना उद्यमनगरमधील लांजेकर नगर येथे संशयित हालचाली आढळून आल्या. तपास केला असता लियाकत शौकत दावत (वय ४८, रा. ए-१६, लांजेकर नगर, उद्यमनगर, ता. रत्नागिरी) याच्या ताब्यात विनापरवाना ‘प्राण्याचे मांस’ विक्रीसाठी ठेवलेले असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५१ किलो ५०० ग्रॅम मांस, एक दुचाकी आणि एक डीप फ्रीजर असा एकूण १,०६,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त केलेल्या मांसाची प्राथमिक खात्री पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून करून घेण्यात आली आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या पथकाने केली. या पथकात पोउनी संदीप ओगले, सपोफौ स्वाती राणे, पोहवा विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, गणेश सावंत, सत्यजित दरेकर आणि पोशी अतुल कांबळे यांचा समावेश होता.







