

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी १ ऑगस्ट २०२६ पासून NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्यात आतापर्यंत सुमारे ५१ लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी २५ लाख कार्डे कार्यान्वित करण्यात आली आहेत. उर्वरित कार्डेही लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड मिळावे यासाठी ही केंद्रे कार्यरत आहेत.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी इशारा दिला की, स्मार्ट कार्डसाठी निश्चित शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा केंद्रांचा परवानाही रद्द करण्यात येईल.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतींचा लाभ सहज मिळावा, तिकीट प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि एसटीची सेवा अधिक आधुनिक व्हावी, यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित प्रवाशांनी १ ऑगस्टपूर्वी NCMC स्मार्ट कार्ड घेऊन ते सुरू करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







