
पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासह माननीय महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाबाबत धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोरराम यांच्या सूचनेनुसार मुख्य इमारत तातडीने खाली करण्यात आली आहे.
सध्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून संपूर्ण परिसराची कसून तपासणी आणि शोधमोहीम सुरू आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.
शोधकार्य पूर्ण होऊन परिस्थिती सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच मुख्य इमारतीतील कामकाज पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. तोपर्यंत पुणे महानगरपालिका आवारात नागरिकांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.







